मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे सरकार स्थापन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठा दावा केला होता. शिंदे-फडणवीस सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाला असल्याचे वक्तव्य मिटकरी यांनी केले होते. दरम्यान, यानंतर आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी सूचक वक्तव्य करत राज्यात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
आमदार मिटकरींनी आज एक ट्वीट करून मोठी खळबळ उडवली आहे. मिटकरी यांनी, “भाजपाकडून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झाला आहे हे आता एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकलंय. अशी माहिती मला शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राने दिली आहे.”
भाजपा कडून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झालाय हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकलंय.. (शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राची विश्वासपुर्ण माहिती ..
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 15, 2023
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता की, राष्ट्रवादीवर जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल बदलापुरात बोलताना मिटकरी यांनी या दाव्याला दुजोरा दिला.
मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय, परंतु त्यात ते कधीच यशस्वी होणार नाहीत. उलट त्यांचंच काऊंटडाऊन सुरू झाले आहे.