मुंबई – भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच ‘भाडिपा’ प्रस्तुत ‘चिकटगुंडे’ ही लॉकडाऊनवर आधारित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ८ विविध पात्रे, ४ वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कथा आणि प्रेमभावना असा विषय असलेल्या या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला. प्रेक्षकांना या वेबसीरिजचा दुसरा सीझन कधी येईल, याची उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांचे पहिल्या सीझनवरचे प्रचंड प्रेम पाहून फार काळ उत्कंठा ताणू न देता ‘प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत ‘चिकटगुंडे २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. प्लॅनेट मराठीवर ही सिरीज पाहता येणार आहे.
लॅाकडाऊनचे नियम थोडे शिथिल झाल्यानंतरचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये धमाल, गोंधळ, गंभीर असे सगळेच सीन दिसत आहेत. १४ एप्रिल रोजी पहिला एपिसोड प्रदर्शित झाला असून उर्वरित एपिसोड दर शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. गौरव पत्की दिग्दर्शित ‘चिकटगुंडे २’मध्येही सारंग साठे, श्रुती मराठे, सुहास शिरसाट, स्नेहा माझगांवकर, सुशांत घाडगे, चैतन्य शर्मा आणि पुष्कराज चिरपुटकर, श्रुती मराठे अशी स्टारकास्ट आहे.
भाडिपासोबत काम करताना आनंद होतोय. त्यांचा कंन्टेट हा नेहमीच उत्कृष्ट असतो असं मत प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांनी व्यक्त केलं आहे. भाडिपा सोशल मीडियावर विविध प्रकारचा फ्री कॉन्टेन्ट देणार एक प्रसिद्ध चॅनल आहे. आता भाडिपा आणि प्लॅनेट मराठी एकत्र आल्याने प्रेक्षकांना भन्नाट काहीतरी पाहायला मिळणार आहे.