पुणे, – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव ॲड. माधव खानवेलकर (७७) यांचे रविवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. खानवेलकर यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख यांचे ते व्याही होत.
खानवेलकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपकुलसचिव म्हणून प्रशासकाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. भारती विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
खानवेलकर यांचे वडील चिंतामण खानवेलकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर जयकर यांचे सचिव होते. अॅड. माधव खानवेलकर यांचे इंग्रजी, मराठी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व होते. अफाट वाचन आणि कायद्याचा सखोल अभ्यास यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कायदेशीर प्रकरणे यशस्वीपणे हाताळली. पुण्यात भरलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या नियोजनात त्यांचा वाटा होता.