पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील तात्यासाहेब नातू फाउंडेशनच्या वतीने येत्या शनिवारी (दि. १७) रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण लोककला म्हणून प्रसिद्ध असलेल्या पौराणिक दशावतारी संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार भावार्थ देखणे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.
दशावतार हा कोकणाला लाभलेला पारंपरिक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. इतकेच नव्हे तर दशावतार हा कोकणी माणसांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या दशावताराचा अनुभव पुणेकरांनाही घेता यावा, या उद्देशाने आम्ही या संगीत नाटकाचे आयोजन केले आहे, अशी माहिती तात्यासाहेब नातू फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त शारंग नातू यांनी दिली.
या दशावतारी संगीत नाटकामध्ये रामभक्त जांबुवंत या कथेचे सादरीकरण करण्यात येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील नाईक दशावतार नाट्यमंडळातील कलाकार सादरीकरण करणार असल्याचेही नातू यांनी सांगितले.