पुणे, – व्हॅलेनटाईन डे निमित्त गुलाबफुलांनी बाजारपेठ सजली आहे. बाजारात पांढऱ्या, पिवळ्यासह विविध रंगांचे गुलाब उपलब्ध आहेत. मात्र, बाजारात लाल गुलाबांपेक्षा इतर रंगाच्या गुलाबांचीही चलती आहे. गुलाबाला प्रती गड्डीला मार्केट यार्डातील घाऊक बाजारात १५० ते २२० रुपये भाव मिळत आहे, अशी माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली. येथील बाजारात स्थानिक भागासह कोकण, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनी फुलांची खरेदी केल्याचेही भोसले यांनी सांगितले.
बुधवारी (दि. १४) व्हॅलेनटाईन डे आहे. या दिवशी तरुणाईकडून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी होते असते. त्यामुळे व्हॅलेनटाईन डे साठी शेतकरी गुलाबाची फुले राखून ठेवतात. त्याप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांनी राखून ठेवलेली फुले येथील फुल बाजारात आणली आहेत. यावर्षी फुले तुलनेने परदेशात कमी निर्यात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ती फुले स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी आणली आहेत. बाजारात रविवारी (दि. ११) ९ हजार १८६, तर सोमवारी (दि. १२) १४ हजार २२० गड्डी आवक झाली. सर्वाधिक आवक तळेगाव दाभाडे भागातून झाली. त्यानंतर शिरूर भागातूनही आवक झाली आहे.
गेल्या वर्षी व्हॅलेनटाईन डेच्या आधी तीन दिवसांत २८ हजार ४६ गड्डी गुलाबाची आवक झाली होती. यंदा दोन दिवसात २३ हजार ४०६ गड्डी आवक झाली आहे. मंगळवारी (दि. १३) ही आवक होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ती जास्त आहे. – बाळासाहेब कोंडे, फूल विभागप्रमुख, पुणे बाजार समिती