नवी दिल्ली: दिल्लीत करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून यापुढे दिल्लीतील रुग्णालये केवळ दिल्लीकरांसाठीच उपलब्ध असतील, असा आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. केंद्र सरकारकडून चालवली जाणारी रुग्णालये या आदेशाला अपवाद असणार आहेत. दिल्लीतील खासगी रुग्णालयांमध्येही केवळ दिल्लीकरांवरच उपचार होणार आहेत. जे उपचार देशात अन्यत्र होऊ शकणार नाहीत, केवळ असे उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्येच दिल्लीबाहेरील अन्य रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतील, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या सीमा उद्या उघडल्या जातील. त्याबरोबर दिल्लीतील मॉल, मंदिरे आणि रेस्टॉरंटदेखील उद्यापासून उघडली जातील, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. हॉटेल आणि बॅन्क्वेटमध्ये कदाचित करोना रुग्णांसाठी उपचारांची सुविधा करावी लागेल. त्यामुळे ही ठिकाणे सर्वसामान्यांसाठी इतक्यात उघडली जाणार नाहीत, असे केजरीवाल यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्लीबाहेरील रुग्णांनी केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयांचा लाभ घ्यावा. दिल्लीतील खासगी रुणालयांमध्ये केवळ दिल्लीकरांवरच उपचार केले जातील. दिल्लीकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा समन्वयाचा मार्ग काढला गेला आहे, असे केजरीवाल म्हणाले.