घसरलेला विकासदर आणि भांडवलाच्या अभावाचा परिणाम
पुणे – पुण्यासह देशातील 7 मोठ्या शहरात 2019-20 या आर्थिक वर्षात घर विक्री केवळ 4 टक्क्यांनी वाढून 2 लाख 58 हजार युनिट्स एवढी होण्याची शक्यता आहे.
पुण्यासह मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकत्ता या शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन तयार करण्यात आलेल्या अंदाज अहवालात “ऍनारॉक’ संस्थेने ही माहिती दिली आहे. विकास दर साडेचार टक्के इतका कमी झाला आहे. याचा सर्वसाधारण परिणाम इतर क्षेत्राप्रमाणे रिऍल्टी क्षेत्रावरही होणे अपेक्षित आहे. रोजगाराची शाश्वती नसल्यामुळे ग्राहक खरेदी करीत नाही. त्याचबरोबर भांडवल सुलभता पुरेशी नाही. जीएसटी आणि नोटाबंदीचा परिणाम कमी झाल्यानंतर यावर्षी घर विक्री मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे वर्षाच्या सुरुवातीला वाटले होते. मात्र, नंतर एकूणच अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे व विकास दर खालावल्याने ही वाढ केवळ 4 टक्के होण्याची शक्यता आहे.
मंदीमुळे आणि “एनपीए’च्या भीतीमुळे बॅंक आणि एनबीएफसीकडून खऱ्या अर्थाने रिऍल्टी क्षेत्राला भांडवल पुरवठा सुरू झालेल्या नाही. त्याचबरोबर भविष्य आशावादी न वाटल्यामुळे खाजगी क्षेत्रातून रिऍल्टी क्षेत्रात गुंतवणूक फारशी वाढलेली नाही. या क्षेत्राला फक्त व्यावसायिक बांधकामाचा आधार आहे. निवासी प्रकल्पातून फारशी मागणी वाढलेली नाही. फक्त राहण्यासाठी लोक घर घेत आहेत. गुंतवणूक म्हणून घर घेण्याचा कल थांबलेला आहे. समाधानाची बाब म्हणजे जे प्रकल्प रखडले आहेत, अशा प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 25 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. सध्या किफायतशीर घर क्षेत्रात क्षेत्रातच थोडीफार हालचाल आहे. या क्षेत्रात पहिले घर घेणाऱ्यांना व्याजात सवलत मिळत आहे.
आकडेवारीच बोलते
जानेवारी ते मार्च 2019 या तिमाहीत 56 हजार 200 घरे विकली गेली. त्याप्रमाणात या वर्षात 4 तिमाहीत 2 लाख 58 हजार 410 घरे विकली जाण्याची शक्यता या संस्थेला वाटते. 2018 या पूर्ण आर्थिक वर्षांमध्ये या 7 शहरांमध्ये 2 लाख 48 हजार 300 घरे विकली गेली होती. या वर्षी पहिल्या 2 तिमाहीत बऱ्यापैकी घरांची विक्री झाली होती. मात्र, तिसऱ्या तिमाहीत पुन्हा घर विक्री मंदावली आहे.