पिंपरी (संदीप घिसे ) – एका महिलेला पैशांची गरज होती म्हणून तिने ऑनलाइन कर्जाचा ऍप डाऊनलोड केला. मात्र कर्जाची कोणतीही मागणी न करता अवघ्या 15 मिनिटांत तो ऍप डिलीटही करून टाकला. मागणी केलेली नसतानाही ऍपच्या माध्यमातून तिच्या खात्यात क्षुल्लक रक्कम चार वेळा जमा करण्यात आली. याबाबत त्या महिलेला माहितीही नव्हती. आठ दिवसांनी फोनद्वारे कर्ज परतफेडीसाठी तगादा लावण्यात आला. त्या महिलेला भीती दाखविण्यासाठी तिचे मार्फ केलेले अश्लील) फोटो नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्यात आली.
एका महिलेला पैशाची गरज असल्याने तिने सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे 16 मे रोजी एक ऑनलाइन कर्जाचा ऍप डाऊनलोड केला. त्यासाठी आवश्यक ती माहिती भरली. ऑनलाइन फोटोही पाठविला. मात्र कर्जाची कोणतीही मागणी केली नव्हती. अवघ्या 15 मिनिटांमध्ये तिने “तो’ ऍप डिलीट केला. आपण कर्ज घेतलेच नसल्याच्या भ्रमात ती महिला होती. मात्र त्या ऑनलाइन कर्ज देणाऱ्या ऍपने चारवेळा एक हजार 800 रुपये असे एकूण 7 हजार 200 रुपये बॅंक खात्यात जमा केले. 21 मे रोजी महिलेला कंपनीकडून कर्ज परतफेडीसाठी फोन आला. मात्र आपण कर्ज घेतले नसल्याचे त्या महिलेने सांगितले. बॅंक खाते तपासले असता त्यात एकूण 7 हजार 200 रुपये जमा झाल्याचे दिसून आले. एक हजार 800 रुपयांच्या बदल्यात तीन हजार रुपयांची मागणी केली. असे एकूण 12 हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र त्या महिलेने एवढे पैसे भरण्याबाबत असमर्थता दर्शविली.
त्यानंतर केनिया देशातील फोन नंबरवरून महिलेच्या नातेवाईक व मोबाइलमध्ये असलेल्या सर्वांना त्या महिलेचे मॉर्फ केलेले फोटो पाठविले. यामुळे नातेवाईक व ओळखीच्या लोकांचे फोन येऊ लागले. या घटनेचा त्या महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला. या प्रकाराला घाबरलेल्या महिलेने दागिने विकून बारा हजार रुपये भरले अन् व्हारयल केलेले “ते’ फोटो डिलीट करण्यास सांगितले. परंतु ते फोटो डिलीट न करता पाठविणे सुरूच ठेवले.
सायबर सेलमध्ये तीन दिवस मारल्या चकरा
सायबर फसवणूक झाल्यास ऑनलाइन तक्रार करा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा, असे व्टिट पोलीस आयुक्तांनी केले आहे. मात्र याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी त्या महिलेने तीन दिवस सायबर सेलमध्ये चकरा मारल्या. मात्र तरीही तिची तक्रार घेतली नाही. अखेर त्या महिलेने सायबर कॅफेमधून ऑनलाइन तक्रार केली. आपल्या तक्रारीची कितपत दखल घेतील, याबाबतही ती महिला साशंक आहे.
फोटो डिलीट करण्यासाठी आणखी पैशाची मागणी
कर्ज घेतलेल्या कंपनीने सांगितल्याप्रमाणे 12 हजार रुपये भरले. त्यानंतर त्या महिलेने नातेवाईकांना पाठविलेले अश्लिल फोटो डिलिट करण्याची विनंती केली. मात्र त्यासाठीही आरोपींनी आणखी दोन हजारांची मागणी केली. एवढे पैसे आपल्याकडे नाहीत, असे सांगितल्यावरही एक हजार रुपये घेतले आणि फोटोही डिलिट केले नाहीत. अजूनही त्या महिलेकडे पैशाची मागणी होत असून मॉर्फ केलेले फोटोही नातेवाइकांना पाठविणे सुरूच आहे.
सायबर सेलमध्ये तीन दिवस मारल्या चकरा
सायबर फसवणूक झाल्यास ऑनलाइन तक्रार करा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा, असे व्टिट पोलीस आयुक्तांनी केले आहे. मात्र याबाबत तक्रार नोंदविण्यासाठी त्या महिलेने तीन दिवस सायबर सेलमध्ये चकरा मारल्या. मात्र तरीही तिची तक्रार घेतली नाही. अखेर त्या महिलेने सायबर कॅफेमधून ऑनलाइन तक्रार केली. आपल्या तक्रारीची कितपत दखल घेतील, याबाबतही ती महिला साशंक आहे.