पिंपरी – अत्याधुनिक बदलांसह अत्यावश्यक सेवा-सुविधांचा समावेश करून आकर्षक रंगातील 30 हिरकणी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून एसटी महामंडळाच्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेत दोनशे हिरकणी बसची बांधणी सुरू आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
हिरव्या व पांढऱ्या रंगातील हिरकणी बस सर्वांना माहिती आहे, पण तिची ही ओळख आता कालबाह्य होणार आहे. एसटी प्रशासनाने पहिल्यांदाच हिरकणीचे रूप बदलले आहे. आता नव्या आकर्षक रंगात हिरकणी रस्त्यावर धावणार आहेत. फिकट जांभळ्या, पांढऱ्या रंगाची रंगसंगती असलेल्या या हिरकणीचे दरवाजेही आता फोल्डिंगचे करण्यात आलेले आहेत. तसेच उद्घोषणेपासून पॅनिक बटनपर्यंत सर्वप्रकारची सुविधा प्रवाशांना नव्या हिरकणीत मिळणार आहे. हिरकणीची आसनक्षमता 45 असून ऍल्युमिनिअमच्या पत्र्याऐवजी “एमएस’चा (माइल्ड स्टील) वापर करण्यात येत आहे. यामुळे बस खड्ड्यातून गेली तरी पाठीमागच्या आसनावर बसलेल्या प्रवाशांना हादरा बसणार नाही. दापोडीतील कार्यशाळेत दोनशे नव्या बसची बांधणी केली जात आहे. यापैकी 30 गाड्यांचे काम पूर्ण झाले असून, त्यातून राज्यातील विविध आगारांतून प्रवासी वाहतूकही सुरू झाली आहे.
दापोडीतीलमध्यवर्ती कार्यशाळेतून आत्तापर्यंत 30 हिरकणी बस आणि 143 लालपरी रवाना झाल्या आहेत. हिरकणी बसमधील 10 बसला साधे दरवाजे होते. त्यानंतर मात्र, 20 बसला फोल्डिंगचे दरवाजे बसविण्यात आले आहेत. तर, तयार करण्यार येणाऱ्या उर्वरित सर्व बसला फोल्डिंगचे दरवाजे बसविण्यात येणार आहे. पूर्वी युएसबी चार्जिंग पॉंइंट वरच्या बाजूला होता. आता तो प्रवाशांच्या सुविधेसाठी खालच्या बाजूला देण्यात आला आहे. प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात हे लक्षात घेऊन आवश्यक बदल केला आहे.
– दत्तात्रेय चिकुर्डे, व्यवस्थापक, दापोडी मध्यवर्ती कार्यशाळा, राज्य परिवहन महामंडळ
हिरकणीची वैशिष्ट्ये
आसनाजवळ मोबाइल चार्जिंगची सुविधा
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची सोय;
चालक किंवा वाहकाला प्रवाशांना काही सूचना द्यायच्या असल्यास उद्घोषणा प्रणाली विकसित
छत, हॅट रॅक (समान ठेवण्याची जागा) आणि सीट यांना एकच रंगसंगती
वाहकाला सर्वांत पुढे स्वतंत्र आसन आणि जवळच तिकीट मशीन चार्जिंगची सोय
आत गडद चॉकलेटी, लाइट चॉकलेटी व ऑफ व्हाइट अशा तीन रंगसंगती
पाठीमागील चाकास एअर सस्पेंशन