पुणे – करोना संकट असूनही, यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र सुरू आहे. महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. पण, या मुलांना फक्त पुस्तकांचाच आधार मिळाला आहे.
गेल्या दीड-दोन वर्षांत मुलांना पालिकेने ना वह्या दिल्या, ना शिक्षणासाठीचे इतर पूरक साहित्य दिले. तर, पालकही जमेल तसे शैक्षणिक साहित्य मिळवून देत आहेत. त्यामुळे या मुलांचे शिक्षण असेतसेच सुरू असल्याचे समोर आले आहे.
महापालिका शाळांत शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलांचे पालक मजुरीचे काम करतात. त्यातही काहींनी शहरातून स्थलांतर केले असून या मुलांचे शिक्षण अर्धवटच सुटले आहे. तर, जे आहेत त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा नसल्याने या मुलांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. 25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हापासून शाळा बंदच आहेत. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 15 जून 2020 पासून आणि आता 2021 मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पहिल्या सत्राचे दोन महिने संपले आहेत.
यापूर्वी नियमित शाळा सुरू असताना या विद्यार्थ्यांना पालिकेकडून गणवेश, पुस्तके, दप्तर, वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्य दिले जायचे. या साहित्याची रक्कम गेल्या काही वर्षांपासून थेट मुलांच्या बॅंक खात्यात जमा करते. मात्र, मागील वर्षीपासून करोना आणि लॉकडाऊनचे कारण पुढे करत पालिकेने ही डीबीटीची रक्कम दिलीच नाही. शाळा नाही, तर मग दप्तर तसेच गणवेश कशाला? असा निकष लावत वह्या आणि इतर पूरक शैक्षणिक साहित्य न देता केवळ पुस्तके देण्यात आली. त्यामुळे मुलांनी आपल्याकडे असलेल्या जुन्या वह्या आणि इतर साहित्यावर वर्ष काढले. यंदाही शाळा ऑनलाइन सुरू होऊन दोन महिने झाले तरी पालिकेने अद्यापही कोणतेही साहित्य घेण्यासाठी “डीबीटी’द्वारे रक्कम दिलेली नाही. त्यामुळे पालकांकडून पदरमोड करून जमेल तसे साहित्य उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
मागील वर्षी करोना-लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थांचे पालक स्थलांतरित झाले. तसेच मुलांची नेमकी पटसंख्या नव्हती. त्यामुळे मुलांना खात्यावर “डीबीटी’ची रक्कम दिलेली नाही. मात्र, यावर्षी पुस्तकांसह, शैक्षणिक साहित्याचे “डीबीटी’ देण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच ही रक्कम मुलांच्या खात्यात देण्यात येणार आहे.
– मीनाक्षी राऊत, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी, मनपा