ऐनवेळी बस होतात रद्द; प्रवाशांचे हाल
– विष्णू सानप
पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाची (एस.टी.) शिवशाही बसची ऑनलाइन बुकिंग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. राज्यातील प्रवाशांना जलद आणि आरामदायक प्रवास मिळावा यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही व इतर नवीन बस दाखल झाल्या आहेत. मात्र, ह्या बसच्या मोठ्या प्रमाणात समस्या समोर येऊ लागल्या आहेत. वाढते अपघाताचे प्रमाण, बसमधील सोयी-सुविधांविषयीच्या तक्रारी तर, आता ऑनलाइन बुकिंग करूनही ऐनवेळी बसच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना पैसे, वेळ खर्च करून नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हटले की, सामान्य माणसांची हक्काची बस म्हणून बघितले जाते. राज्यातील बहुतांश प्रवासी आजही सुरक्षित आणि माफक दरात प्रवास देणारी सेवा म्हणून एसटीकडे बघतात. मात्र, आलीकडील काळात एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यातील प्रवासी एसटी पासून दूर जात आहे. एसटीची आधुनिक बस म्हणून शिवशाही बसला ओळखले जाते. मात्र, नियोजनाअभावी या बसकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. तर, प्रवाशांची संख्या कमी असल्याने शिवशाही बस रद्द करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा थेट फटका ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. ऑनलाइन तिकीट काढणारे प्रवासी तिकिटावर दिलेल्या वेळेनुसार नोंदणी केलेल्या ठिकाणी जाऊन थांबतात. मात्र, प्रवासी संख्या कमी असल्याने बसची फेरी अचानक रद्द करण्यात येत असून, वेळेवर स्लिपर तिकीट असणाऱ्या प्रवाशांच्या माथी सिटर बस मारली जात आहे. तिकीट दराचा फरकही वेळेवर दिला जात नसल्याच्या तक्रारी करणारांचे प्रमाण वाढले आहे.
आळंदी येथील प्रवासी व्यंकटेश नाईकवाडे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे भोसरी ते शिर्डी स्लिपर बसचे तिकीट ऑनलाइन काढले. तिकिटावर दिलेल्या वेळेनुसार ते भोसरी येथील एसटी थांब्यावर मंगळवारी (दि. 7) रात्री 11 वाजता आजारी बहीण व आईवडिलांसमवेत थांबले. मात्र, बस येण्याच्या 10 मिनिटे आधी त्यांना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी फोनवर बस रद्द झाल्याचे सांगितले. दुसरी बस आपल्याला वाकडेवाडी येथे मिळेल असे सांगितले. मात्र, तेथे गेल्यावर त्यांना स्लिपर बस ऐवजी सिटर बसमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी बसायला सांगितले. कुठल्याही परिस्थितीत शिर्डी येथे पोचायचे असल्याने शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला नाविलाजास्तव बसमध्ये प्रवास करावा लागला आहे. याबाबत तिकीट फरक देण्यात येईल असे म्हणून एसटी कर्मचाऱ्याने वेळ निभावून नेली. मात्र, रात्री-बेरात्री आजारी प्रवाशांना एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे. याबाबत एसटी प्रशासनाकडे विचारणा केली असता तिकिटातील फरक मिळेल असे सांगण्यात आले.
शस्त्रक्रिया झालेली असल्याने बहिणीला शिर्डीसाठी तात्काळ रुग्णालयात पोचायचे होते. त्यासाठी आईवडील व बहीण यांना आरामदायक प्रवास व्हावा याकरिता शिवशाही स्लिपरचे तिकीट ऑनलाइन काढले होते. मात्र, ऐनवेळी बस रद्द झाली व त्याऐवजी वाकडेवाडी येथील स्थानकात बोलावून वेळेवर सिटर बस दिल्याने मोठा त्रास व मनस्ताप झाला. यापुढे खासगी बसनेच प्रवास करणार.
– व्यकंटेश नाईकवाडे, तक्रारदार