सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगीर
पिंपरी – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी शहराच्या महापौर माई ढोरे यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शहरातील सामाजिक संघटनांसह विरोधी पक्षाने महापौरांवर जोरदार टीका केल्याने हा विषय चर्चेचा बनला असताना बुधवारी आपल्या विरोधात हे राजकीय षडयंत्र केल्याचा आरोप केला होता. मात्र गुरुवारी (दि.9) “यु टर्न’ घेत थेट दिलीगीरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सांगवी येथे झालेल्या कार्यक्रमासाठी महापौर उपस्थित होत्या. त्यात महापौरांनी सावित्रीबाई फुले या “इंग्रजांच्या घरी धुणीभांडी करत होत्या’, अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधी पक्षांने त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली.
सामाजिक संघटनेच्या वतीने पिंपरी चौकामध्ये महापौर निषेध आंदोलन ही पार पडले. त्यानंतर दुपारी महापालिका भवनामध्ये महापौर कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी महापौरांना घेराव घालत घोषणा दिल्या.