नगर -लॉकडाऊनमुळे 24 मार्चपासून नेप्ती उपबाजार आवारातील कांदा खरेदी बंद होती.मात्र आता आडते व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होवून दि. 11 जूनपासून सुरु कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले दिली.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता बाजार आवारामध्ये येणारे शेतकरी, आडते व्यापारी, माथाडी कामगार, मापाडी, महिला हमाल कामगार व इतर घटकांची आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे बाजार आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वारावर स्कनिंग मशिनद्वारे तपासणी करुन प्रवेश देण्यात यावा.
त्याचप्रमाणे माथाडी कामगारांना काम करतांना मास्क, हॅण्डग्लोस, गम शूज, सॅनिटायझर पुरविणे अतिशय महत्वाचे आहे. इत्यादी वस्तू पुरविण्याबाबत आडते व्यापारी किंवा संबंधित घटकांना सूचना द्याव्यात. सामाजिक अंतर पाळणेबाबत आपण स्वत: लक्ष घालून गर्दी होणार नाही, जेणेकरुन बाजार आवारात येणारे सर्व घटकांचे आरोग्यास धोका निर्माण होणार नाही, काळजी घेण्यात यावी, अशी मागणी घुले यांनी बाजार समितीकडे केली.