घाऊक बाजारात किलोस 30 ते 40 रुपये भाव
दहा दिवसांपूर्वी मिळत होता 80 रुपये भाव
पुणे – कांद्याचे भाव उतरण्यास सुरुवात झाली आहे. 10 दिवसांत भावात निम्म्याने घसरण झाली आहे. सध्या घाऊक बाजारात किलोस 30 ते 40 रुपये भाव मिळत आहे. 10 दिवसांपूर्वी हाच भाव 80 रुपये होता.
वाढलेली आवक, त्या तुलनेत कमी असलेल्या मागणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. दरम्यान, किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव घटले असून, दर्जानुसार 60 ते 80 रुपये किलो भावाने विक्री होत असल्याची माहिती किरकोळ विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी दिली.
शुक्रवारी बाजारात तब्बल 170 ट्रक कांद्याची आवक झाल्याचे सांगून पोमण म्हणाले, गरवी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. पुणे विभागातून तुरळक प्रमाणात कांद्याची आवक सुरू झाली आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड येथून लाल हळवी कांद्याची मोठी आवक होत आहे. पुण्याबरोबरच नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर बाजार समितीतही कांद्याची आवक वाढली आहे. दक्षिण भारतातून कांद्याची आवक घटली आहे. कर्नाटक येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे तेथून मागणी घटली आहे. तेथून काही प्रमाणात कच्चा मालाला मागणी आहे. तामिळनाडू, केरळ येथून उच्च प्रतिच्या आकाराने मोठ्या असलेल्या कांद्याला मागणी आहे. तुर्की, इजिप्त, कझाकिस्तान येथून आलेला कांदाही बाजारात उपलब्ध आहे. मात्र, स्थानिक कांदा आता बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या कांद्याच्या खरेदीकडे नागरिक, व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे.
कांद्याचे भाव उतरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा भाव मिळणार नाही, या शक्यतेने कच्चामाल शेतकरी बाजारात आणू लागले आहेत. बाजारात दाखल होणाऱ्या मालामध्ये कच्चा मालाचे प्रमाण मोठे आहे. आगामी 15 दिवसांत गरवी कांद्याची आवक वाढेल. कांद्याचे भाव 20 ते 30 रुपयापर्यंत खाली येतील. ते टिकून राहतील.
– रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी