हजारोंच्या जनसमुदायाने दिला अखेरचा निरोप
कराड – जम्मू-काश्मीर नौशेरा सेक्टरजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले मुंढे (ता. कराड) गावचे सुपुत्र जवान संदीप सावंत यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी कराडमध्ये आणल्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी व अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली होती.
कराड येथील विजय दिवस चौकातून सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हुतात्मा संदीप सावंत यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. “भारतमाता की जय’, “शहीद संदीप सावंत अमर रहे’, अशा घोषणा देण्यात आल्या. मुंढे येथे दुपारी 1.15 वाजता हुतात्मा संदीप यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून हुतात्मा संदीप यांना अखेरची मानवंदना दिली.
हुतात्मा संदीप सावंत यांचे पार्थिव बुधवारी सकाळी जम्मूतून दिल्लीत आणण्यात आले. तेथून सायंकाळच्या सुमारास हुतात्मा संदीप सावंत यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आले. तेथून लष्कराच्या वाहनाने पार्थिव शुक्रवारी सकाळी 8 वाजता कराडमध्ये आणण्यात आले. तेथे 25 ते 30 हजार नागरिकांनी हुतात्मा संदीप यांना श्रद्धांजली वाहिली. विजय दिवस चौकातून 8.30 वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेस सुरुवात करण्यात आली.
“भारतमाता की जय’, “शहीद संदीप सावंत अमर रहे’, “जय जवान, जय किसान’, “जब तक सूरज चॉंद रहेगा, संदीप तेरा नाम रहेगा’, “वीर जवान तुझे सलाम’ अशा घोषणा देत दत्त चौक-कोल्हापूर नाकामार्गे-गोटे येथील नवीन बसस्टॉप-मुंढे येथील मराठी शाळा-ग्रामपंचायत आणि चव्हाण मळा अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. निवासस्थानी हुतात्मा संदीप यांचे पार्थिव थोडा वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी वडील रघुनाथ, आई अनुसया, भाऊ शशिकांत, पत्नी स्मिता यांनी केलेल्या आक्रोशाने नागरिक व भारतीय सैन्यदलातील जवानांची मने हेलावली. काही वेळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तेथे ठेवण्यात आले होते.
त्यानंतर त्यांचे पार्थिव कराड-पाटण महामार्गालगत मुंढे-विजयनगर येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कारच्या ठिकाणी आणण्यात आले. तेथे सैन्यदलाच्यावतीने कर्नल एच. एन. जाधव, राज्य शासनातर्फे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कर्नल संभाजी पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव, मुंढेचे सरपंच रमेश लवटे यांनी पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा संदीप सावंत यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून हुतात्मा संदीप यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर हुतात्मा संदीप यांच्या पार्थिवाला भाऊ शशिकांत यांनी अग्नी दिला. यावेळी संपूर्ण वातावरण शोकाकूल झाले होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी विविध घोषणा देत हुतात्मा संदीप यांना अखेरचा निरोप दिला.