पुणे, दि. 28 –शहरात खासगी वाहनांची संख्या 33 लाखांवर पोहचली आहे. यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. मात्र त्याचवेळी शहरातील वृक्षसंपदाही वाढत असल्याने शहरात दरडोई दीड झाड, तर एक वाहन असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे. महापालिकेने शहरात केलेल्या वृक्षगणनेनुसार झाडांची एकूण संख्या तब्बल 51 लाख 3 हजार 602 आहे.
शहरात हडपसर-मुंढवा-4 लाख 99 हजार 757, कोथरूड-बावधन-4 लाख 88 हजार 965, नगररस्ता-वडगावशेरी-4लाख 86 हजार 25, शिवाजीनगर-घोले रस्ता-4 लाख 76 हजार 546, औंध-बाणेर-4 लाख 58 हजार 695, येरवडा-कळस-धानोरी-2 लाख 56 हजार 430, ढोले-पाटील रस्ता-2 लाख 85 हजार 467, कोंढवा-येवलेवाडी-2 लाख 27 हजार 248, वारजे-कर्वेनगर 1 लाख 89 हजार 241, वानवडी- रामटेकडी 1 लाख 97 हजार 459, सिंहगड रस्ता- 1 लाख 64 हजार 45, बिबवेवाडी क्षेत्रीत कार्यालय हद्दीत 1 लाख 29 हजार 856 तर कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 35 हजार 426 झाडांची गणना झालेली आहे.
शहरात झाडांच्या 430 प्रजाती
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून जीआयएस प्रणालीद्वारे ही वृक्षगणना करण्यात आली असून, त्यात तब्बल 430 वृक्षांच्या प्रजाती आढळून आलेल्या आहेत. तर सर्वांत जास्त झाडे गिरीपुष्पाची असून सर्वांत मोठे खोड असलेले झाड वडाचे असून त्याचा घेर 1202 सेंटीमीटर आहे. तर एकूण 75 कुळांची ही झाडे असून त्यात 124 दुर्मिळ प्रजाती आहेत. प्रामुख्याने शहराच्या टेकड्यांच्या परिसरात सर्वाधिक झाडे असून यात नव्याने समाविष्ट 23 गावांमधील झाडांचा समावेश नाही. तसेच कॅन्टोन्मेंटमधील झाडांचीही वृक्षगणना सुरक्षेच्या कारणास्तव झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात शहरातील ही वृक्षसंपदा 60 लाखांवर असण्याची शक्यता आहे.