शिरूर – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी येथे मुंबईवरून आलेल्या एका 58 वर्षीय पुरुषाचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व टाकळी हाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड यांनी दिली आहे.
साबळेवाडी येथे (दि. 3) रोजी पाचजण मुंबई येथून आले होते. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु यामधील 58 वर्षीय पुरुषाला 10 जून रोजी त्रास होऊ लागल्याने त्याला टाकळीतील प्राथमिक रुग्णालयाच्या वतीने औंध येथे तपासणीसाठी पाठवले होते. तेथे त्याची करोना तपासणीकरिता नमुने घेतले असता (दि. 11) रात्री उशिरा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, बेट परिसरात कवठे येमाई, म्हसे बुद्रुक आदी गावांमध्ये यापूर्वी करोनाची रूग्ण आढळून आले होते. करोनाचा ग्रामीण भागात शिरकाव वाढत असल्यामुळे नागरिकांमधून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.