मालेगाव – तालुक्यातील झोडगे गावात विहिरीवर पाणी भरण्यासाठी माय-लेकीचा गुरुवारी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पिण्याच्या पाण्यासाठी मायलेकीचा बळी गेल्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
निताबाई जाधव (47) व इच्छामणी जाधव (16) अशी मृत आई व मुलीची नावे आहेत. या दोघी गुरुवारी दुपारी गावालगतच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या पोहऱ्याने पाणी बाहेर काढत असताना अचानक विहिरीत पडल्या.
सायंकाळी या विहिरीवर आलेल्या एका पशुपालकाला या दोघींचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले. त्यानंतर त्याने त्याची माहिती गावकऱ्यांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगाव स्थित सामान्य रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरा मायलेकींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.