वाई – वाई तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आंबेडकर नगरमधील महावीर कांतिलाल शिंदे (वय 40) हे झाडावर चढून फांद्या तोडत असताना, विजेचा धक्का बसून, ते झाडाच्या फांदीवर कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्यांच्या नातेवाइकांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महावीर शिंदे हे बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास शेळीला पाला काढण्यासाठी झाडावर चढले.
ते झाडाच्या फांद्या तोडत असता, जवळून जाणाऱ्या त्यांना मुख्य वीज वाहिनीचा स्पर्श त्यांच्या कुऱ्हाडीला झाला. त्यामुळे शिंदे यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे ते झाडाच्या फांदीवरच कोसळले. ते बराच वेळ तशाच अवस्थेत झाडावर पडून होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून मुख्य वाहिनीचा वीजपुरवठा बंद करायला सांगितले. त्यानंतर शिंदे यांना खाली उतरवण्यात आले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेने आंबेडकर-नगरावर शोककळा पसरली आहे.