श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने वाकडी फाटा येथे नाकाबंदी दरम्यान बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या मार्गावर एका जणास ५६ हजार रुपयांच्या ५.७३० कि.ग्रॅ. वजनाच्या गांजासह अटक केली आहे.याप्रकरणी दिपक गाठुसिंग बारेला (वय ४५, रा. सावननगर, दिघी, जि. पुणे) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दि. १ रोजी रात्री लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वाकडी फाटा येथे नाकाबंदी करीत असताना बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या मार्गावर एक संशयित मोटारसायकल येताना दिसली. मोटारसायकलवरील व्यक्तीला पोलीस पथकाने थांबवले.
त्याच्या पाठीवर असलेल्या एका काळया रंगाच्या बॅगेतून उग्र व दर्प आणणाऱ्या अंमली पदार्थाचा वास पोलिसांना आला. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दीपक गाठुसिंग बारेला (रा.सावननगर, दिघी, जि. पुणे) असे सांगितले. त्याचेकडील बॅगेची झडती घेतली असता बॅगमध्ये दोन पारदर्शक कॅरिबॅगमध्ये पॅक केलेला ५६ हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला.
गांजाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा हा त्याचा साथिदार रामचंद्र पावरा, (रा. शिरपूर जि. धुळे) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडन ५.७३०कि.ग्रॅ. वजनाचा ५६ हजार रुपये किंमतीचा गांजा, ९० हजारांची मोटारसायकल, काळया रंगाची बॅग, असा एकूण १ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दि.४ एप्रिलपर्यंत त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.