संगमनेर, (प्रतिनिधी)- जांबुत खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला तातडीने संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने दवाखान्यात जाऊन या तरुणाची भेट घेऊन मदतीच्या सर्व सूचना दिल्या.
जांबुत खुर्द गावातील वाडा वस्ती येथील शिवाजी पारधी हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. यामध्ये त्याच्या उजव्या खांद्याला, छाती, पोट आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.
यावेळी गावातील नागरिकांनी तातडीने त्यांना औषध उपचारासाठी संगमनेर येथील कुटे हॉस्पिटल येथे अॅडमिट केले. तेथे उपचार सुरू असताना आमदार बाळासाहेब थोरात व कॅन्सरतज्ज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन या तरुणाची भेट घेत चौकशी केली. याप्रसंगी या तरुणाला मदतीच्या सर्व सूचना आमदार थोरात यांनी दिल्या. त्यानंतर पुढील उपचारासाठी शिवाजी पारधी या तरुणाला एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आले आहे.