महाळुंगे इंगळे (वार्ताहर) – संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या करोनाच्या विषाणूवर मात करण्यासाठी आणि अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्याच्याबरोबर सामना करण्यासाठी चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील ताब्यात घेण्यात आलेल्या म्हाडामधील 376 सदनिकांमध्ये एकूण दीड हजार खाटांचे साहित्य उपलब्ध झाले आहे. याठिकाणी आवश्यक व तातडीच्या सेवा सुविधा मिळाव्यात, आणि येथे कायमस्वरूपी स्वच्छता राहावी, याकरिता येथील खोल्या निर्जंतुकीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात
आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आलेल्या या सदनिकांमध्ये आवश्यक त्या सर्व तातडीच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. अत्यंत गंभीर स्थिती उद्भवल्यास याठिकाणी करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी याठिकाणी नर्स व तज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक सेवेला हजर राहणार आहेत. तसेच याठिकाणी असणारा आठवा मजला डॉक्टरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. म्हाडामधील हा परिसर चकाचक व स्वच्छ ठेवण्यासाठी येथे सफाई कामगारांची कायमस्वरूपी नेमणूक केली जाणार आहे. तसेच दीड हजार खाटांपैकी एका खोलीमध्ये चार खाटांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पारासुर यांनी दिली.
दरम्यान, या सदनिका ताब्यात घेतल्या नंतर पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, उपजिल्हाधिकारी अमर माने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, माजी उपसभापती भगवान पोखरकर, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ परासूर, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी बी. बी. गाढवे, संदीप कोहिनकर, भरत शेंडगे, काळूराम महाळुंगकर, किरण शिवळे, विशाल भोसले, सुनील मिंडे आदींनी पाहणी केली आहे.