सातारा – कास पठारावरील फुलांचा हंगाम दि. 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. परंतु यंदाच्या फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकाला दीडशे रुपये शुल्क मोजावे लागणार आहेत. कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे कासवरील पर्यटन आणि फुलोत्सव यंदा खिशाला भारी पडणार आहे.
कास पठारावरील फुले पाहण्यासाठी गतवर्षी शंभर रुपये शुल्क होते. दरम्यान पार्किंग शुल्क व पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी वेगळे शुल्क आकारले जात होते. परंतु यावर्षीसाठी पार्किंगवरून पठारावर येण्यासाठी असणाऱ्या बसचे शुल्क व पर्यटन शुल्क असे एकत्रित प्रतिव्यक्ती दीडशे रुपये आकारले जाणार आहेत. याबाबतचा निर्णय कास पठार कार्यकारी समितीच्या बैठकीत नुकताच घेण्यात आल्याचे समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत त्यांनी सांगितले.
सध्या पठारावर चवर, पांढऱ्या रंगाची बेंद, पाचगणी आंबरी ही फुले बहरत असून पांढरे चेंडूच्या आकाराचे गेंद फूलही दिसू लागले आहे. पावसाचे प्रमाण कमी होऊन ऊन पडू लागले आहे. त्यामुळे विविध रंगी फुलांचा बहर येण्यास सुरुवात होत आहे. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता दिसत आहे.
कार्यकारी समितीमार्फत सद्यस्थितीत पठारावर असणारे मंडप गुहा, कुमुदिनी तळे, कास तलाव, न्यू पॉईंटला पर्यटकांना पन्नास रुपये शुल्क आकारून प्रवेश दिला जात आहे. कास पठारावर फुलांची संख्या कमी झाल्याने अभ्यासकांच्या अभिप्रायानुसार पठाराला असणारी लोखंडी जाळी गतवर्षी काढण्यात आली. तेथे तंगुस धाग्याची जाळी लावण्यात आली आहे. पर्यटक फुलांच्या क्षेत्रात कसेही प्रवेश करत असल्याने पठारावर समितीच्यावतीने फुलांचे संरक्षण करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. कास परिसरात सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरी कधी धुके व कधी रिमझिम पाऊस असे मनोहारी वातावरण आहे. विकेंड संपला असला तरी दर महिन्याचा शनिवार- रविवार कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी असणार आहे.