लोणावळा – ग्रामपंचायतीचा कर थकविणाऱ्या मोठ्या संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा कुसगाव ग्रामपंचायतीने पत्रकार परिषद घेऊन दिला आहे. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत हद्दीतील सिंहगड महाविद्यालय तसेच आयआरबी कंपनी यांच्याकडून मागील काही वर्षांपासून कर भरला जात नसल्यामुळे ग्रामपंचायतीला विकासकामे करताना अडथळे येत असल्याची भुमिका सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी व ग्रामसेवक बी.एस.भोईर यांनी यावेळी मांडली.
याविषयी सूरज केदारी म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार करास पात्र मालमत्ताच्या नोंदी ग्रामपंचायतीने केल्या आहेत. सिंहगड संस्थेच्या 50 नोंदी आहेत. यापैकी 8 नोंदी ज्या शैक्षणिक इमारती आहेत. त्या करमुक्त केल्या आहेत. धार्मिक व शैक्षणिक नियमानुसार 28 मिळकती रहिवासी असून त्यांना कर लावला आहे. तसेच 14 मिळकती या वसतीगृह असून त्यांना कर लावला आहे. मात्र त्याचा कर भरलेला नाही.याप्रकरणी संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे. करोनामुळे दोन वर्ष संस्था बंद होत्या. म्हणून कर भरणा करण्यासाठी फार जोर लावला नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता ग्रामपंचायत विनंती करत आहे की संस्थेने कर भरावा अन्यथा कारवाई झाल्यास त्याला संस्थाच जबाबदार असेल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांची कार्यालये व इतर मालमत्ता गावात आहेत. त्यांनी मागील 20 वर्षात गावासाठी एकही विकासकाम केलेले नाही. सीएसआर फंड गावात विकास कामांसाठी वापरला नाही. वारंवार सूचना देऊनदेखील मालमत्तांच्या नोंदी आयआरबी करत नसल्याने अखेर ग्रामपंचायतीने ठराव करून कर लावला आहे. त्यांच्या नोंदी लावल्या आहेत. दोन्ही संस्थांनी कर भरल्यास गावातील विकासकामे करणे सोपे होईल, असे मत सरपंच गुंड यांनी व्यक्त केले.
उपसरपंच सूरज केदारी म्हणाले, आता ग्रामपंचायत कर न भरणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ग्रामपंचायतीचे 2 कोटी 12 लाख हे कर वसुलीचे उद्दिष्ट आहे. यापैकी 1 कोटी 14 लाख रुपये जमा झाले आहे. सध्या सिंहगड संस्थेकडे 58 लाख 63 हजार लाख व आयआरबी कडे 11 लाख रुपये कर बाकी असल्याचे ग्रामसेवक भोईर यांनी सांगितले.
सिंहगडची सहकार्याची भूमिका
याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांच्याकडे विचारणा केली असता, आमच्या शासकीय अस्थापना असल्याने त्यांना कर लागू होत नाही, याबाबत ग्रामपंचायतीला कळविले असल्याचे सांगितले. तर सिंहगड संकुलचे संचालक एम.जी. गायकवाड म्हणाले, सिंहगड संस्थेने कायमच कुसगाव ग्रामपंचायत व गाव यांना सहकार्याची भुमिका ठेवली आहे. ती पुर्वीही होती आणि भविष्यात देखील असणार आहे. करोनामुळे काही अडचणी निर्माण झाल्या मात्र त्यावर मार्ग काढण्याचा संस्थेचा प्रयत्न सुरु आहे.