नाशिक – छत्रपतींनी जी मंदिरे वाचवली त्या छत्रपतींना शिकविण्याचे धाडस करु नका,’ अशा शब्दांत संयोगिताराजे छत्रपती यांनी काळाराम मंदीरातील पुराणोक्तपद्धतीने मंत्र म्हणणाऱ्या महंतांविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोल्हापूर गादीचे संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी असणाऱ्या संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली.
यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली. महंतांनी पूजा पुराणोक्तपद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. त्यास महंतांनी विरोध केल्याने संयोगिताराजे चांगल्याच संतापल्याचे पहायला मिळाले. हा सगळा प्रकार संयोगिताराजे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या आरोपांवर आता महंत सुधीरदास यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महंत सुधीरदास म्हणाले,’महाराज आम्ही छत्रपतींच्या घराण्यातील असल्यामुळे आमचं पूजन हे वेदांनुसार करण्यात यावं. तेव्हा मी पूर्ण आदराने त्यांचा सन्मान राखत त्याठिकाणी असं सांगितलं की, प्रभू रामचंद्रांना कुठल्याही यजमानांचं अभिषेक पूजन हे केल्यानंतर पुरुषसुक्तानेच भगवंताचं पूजन अभिषेक केला जातो.
ते पुढे म्हणाले, तो शुक्ल यजुर्वेदातील ३१ व्या अध्यायातील ही मंत्ररचना आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलामध्ये ही रचना आहे, त्यानुसारच आपण अभिषेक करत असतो. त्यानंतर ताई पुन्हा संकल्पाला बसल्या. सर्व पूजन केलं. प्रभू रामचंद्रांचा मी दिलेला प्रसाद त्यांनी स्वीकारला. मला ११ हजार रुपयांची दक्षिणाही दिली. अशी माहिती त्यांनी सांगितली.
त्यानंतर आम्ही चर्चा करत असताना त्यांच्या मर्सिडिजपर्यंत मी त्यांना सोडायला गेलो. आम्ही छत्रपती घराण्याचा उपमर्द होईल, असं वक्तव्य आम्ही केलं नव्हतं. काही गैरसमजातून हा विषय झाला असावा. आता आम्ही थोरले छत्रपती शाहू महाराज यांना भेटण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहोत. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगणार आहोत. छत्रपती घराणं आणि पूजारी घराणं यांचे अनेक पिढ्यांचे संबंध आहेत. काही गैरसमज झाला असेल तर प्रत्यक्ष भेटून तो दूर करण्यासाठी आम्ही मोठ्या महाराजांना सर्व निवेदन करू. असेही ते म्हणाले आहे.