काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची सत्ता जाण्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. चीनच्या सर्व प्रयत्नानंतर ओली आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकुमार दहल तथा प्रचंड यांच्यातील संघर्ष संपलेला नाही. ओली यांच्या गैरहजेरीत स्थायी समितीची बैठक प्रचंड यांनी घेतली. त्यामुळे ओली यांना पाय उतार होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पंतप्रधान ओली यांच्याच निवासस्थानी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला ओली हे उपस्थित नव्हते. त्यांच्याच अनुपस्थितीत प्रचंड यांनी हे स्पष्ट केले आहे की, पक्षात ओलींबद्दल असंतोष वाढत आहे आणि त्यांना आता जावे लागेल. प्रचंड आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मंगळवारी सकाळी अकरा वाजता पूर्वनियोजित वेळापत्रकात पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले पण ओली उपलब्ध नसताना प्रचंड यांनी त्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेतली.
काठमांडू पोस्टच्या अहवालानुसार, यापूर्वी पंतप्रधानांचे पत्रकार सल्लागार सूर्य थापा यांनी ही बैठक तहकूब केली होती. परंतु स्थायी समितीच्या सदस्या मातृका यादव यांनी पंतप्रधानांनी नकार दिला तरी बैठक कोणत्याही परिस्थितीत होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर प्रचंड यांनी पंतप्रधान ओली यांच्या शिवाय बैठक घेतली, त्यात स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. तथापि, पंतप्रधान ओली यांचे निकटचे नेते या बैठकीपासून दूर राहिले.
गेल्या आठवड्यात बुधवारी स्थायी समितीचे सदस्य पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी पोहोचले. तथापि, ओलीदेखील त्या बैठकीस अनुपस्थित होते. म्हणूनच समितीची बैठक पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु यावेळीही ओली अनुपस्थित राहीलेत. पंतप्रधान ओली यांनी वारंवार बैठक घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र संताप वाढला आहे.
पक्षाचे प्रवक्ते नारायणजी श्रेष्ठ म्हणाले की पंतप्रधान ओली यांची अशाप्रकारे बैठक तहकूब करणे अयोग्य आणि पक्षाच्या विरोधात आहे. त्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या अजेंडावर चर्चा झाली नाही, परंतु पंतप्रधानांशी सल्लामसलत केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांना स्थायी समितीची बैठक बोलावण्याची जबाबदारी सोपविली आहे.