काठमांडू – नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या ‘सीपीएन-यूएमएल” पक्षाने पुष्पकमल दहाल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाइड मार्क्सवादी लेनिनवादी) गटाने आज पक्षाच्या बैठकीनंतर सरकारचा पाठिंबा काढल्याची औपचारिक घोषणा केली. त्यामुळे नेपाळमधील राजकीय समिकरणे बदलली असून दोनच महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
नेपाळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचंड यांनी रामचंद्र पौडेल यांना पाठिंबा जाहीर केला आहे, हेच ओली यांनी प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागील प्रमुख कारण आहे. पौडेल हे नेपाळी कॉंग्रेस या विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि मुख्य म्हणजे ते सत्तारुढ आघाडीबाहेरील उमेदवार आहेत.
नेपाळमधील अध्यक्षीय निवडणुका 9 मार्च रोजी होणार आहेत. प्रचंड यांनी आघाडीत राहून वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली आणि राजकीय समिकरणे बदलल्यामुले सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष बिष्णूप्रसाद पौडेल यांनी सांगितले.
सरकारला धोका नाही…
“सीपीएन-यूएमएल’ने पाठिंबा काढल्यामुळे प्रचंड यांच्या सरकारला लगेचच धोका निर्माण होणार नाही. कारण नेपाळ कॉंग्रेसचे 89 सदस्य संसदेत आहेत. त्यांचा पाठिंबा सरकारला मिळू शकतो. “सीपीएन-यूएमएल’ पक्षाचे 79 सदस्य संसदेत आहेत.
कालच राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीनेही प्रचंड यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचंड यांना सरकारमध्ये कायम राहण्यासाठी केवळ 138 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. नेपाळी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने तेवढे संख्याबळ प्रचंड सहज मिळवून आणू शकतात.