सिडनी (ऑस्ट्रेलिया): ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅन्ड प्रांताच्या प्रिमियर ऍनस्टॅसिया पलाझूक यांनी सिडनी शहराला करोनाचा हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. सिडनी शहरातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याच्या पार्श्वभुमीवर ही घोषणा करावी लागली आहे.
या संदर्भात हॉटस्पॉटला अनुसरून सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी येत्या शनिवारपासून सिडनी शहरामध्ये करण्यात येणार आहे. या उपाययोजनांनुसार गेल्या दोन आठवड्यांमध्ये सिडनीमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तीला क्वीन्सलॅन्डमध्ये प्रवेश करता येणार नाही. याशिवाय सिडनीमध्ये राहिलेल्या व्यक्तीला 14 दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन व्हावे लागेल आणि या वास्तव्याचा खर्च संबंधित व्यक्तीला स्वतःलाच करावा लागणार आहे.
सिडनी शहरात बुधवारी 19 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरातील बार आणि रेस्टॉरंटच्या परिसराला करोना क्लस्टर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात सध्या करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आढळून येतो आहे. या प्रांतात बुधवारी 295 नवीन करोना रुग्ण आढळून आले. मात्र सिडनीमुळे करोनाचा प्रादुर्भाव कोणामुळे एवढा वाढला, हे समजू शकलेले नाही. तेथील नागरिकांमधील संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याचे लक्षात येऊ लागले आहे. सिडनीमध्ये सामुहिक प्रादुर्भावाची लक्षणेही दिसायला लागली आहेत. यामध्ये पर्यटक, नियमित प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा नेहमी ज्या भागात वावर असतो, त्या भागाचा समावेश आहे.
सिडनी शहराला हॉटस्पॉट घोषित करण्याचा निर्णय अगदी शहाणपणाचा आहे, असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे. एक महिला व्हिक्टोरियातून क्वीन्सलॅन्डमध्ये आल्यावर करोना पॉझिटिव्ह आढळली. पण तिने 14 दिवसांचे क्वॉरंटाईन टाळण्यासाठी आपल्या प्रवासाबाबत दिशाभूल करणारी माहिती दिली होती, असे उघड झाले आहे.