नेपाळच्या पंतप्रधानांची आता त्यांच्या पक्षातूनच ‘हकालपट्टी’

प्रचंड- ओली संघर्ष विकोपाला

काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टीमधून हकालपट्टी करण्यात आली. कम्युनिस्ट पार्टीचे प्रवक्ता नारायण काजी श्रेष्ठ यांनी ओली यांचे पार्टीचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती दिली. हा निर्णय ओली यांच्या अनुपस्थितीत घेतलेल्या बैठकीत झाला.

नेपाळच्या राजकारणात पुष्पकमल दहल प्रचंड आणि केपी शर्मा ओली या दोघांचे गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटात टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. ओली फक्त स्वतःच्या समर्थकांना राजकीय लाभ मिळवून देतात आणि प्रचंड यांच्या समर्थकांची मुद्दाम कोंडी करतात या मुद्द्यावरुन मतभेद सुरू आहेत. याआधी ओली यांनी नेपाळची संसद विसर्जित केली.

यानंतर नेपाळमध्ये निवडणुकीची घोषणा झाली. तडकाफडकी झालेल्या या निर्णयांमुळे प्रचंड आणि ओली यांच्या गटातील मतभेद आणखी वाढले. नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या गटाने ओली यांच्या अनेक राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करुन न्यायालयात दाद मागितली आहे. प्रचंड यांच्या गटाने संसद विसर्जित करण्याच्या निर्णयाविरोधात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवर निर्णय येण्याआधीच ओली यांची कम्युनिस्ट पार्टीतून हकालपट्टी झाली.

नेपाळमध्ये ओली यांची युनिफाईड मार्कसिस्ट-लेनिनिस्ट कम्युनिस्ट पार्टी आणि पुष्पकमल दहल प्रचंड यांची युनिफाईड माओइस्ट कम्युनिस्ट पार्टी असे दोन डाव्या विचारांचे पक्ष सर्वाधिक प्रभावी आहेत. चीन सरकारने नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप करुन दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना एकत्र केले होते.

पण भारत सरकारने चिनी डावपेचांना शह देत नेपाळमधील सर्व राजकीय पक्ष आणि प्रमुख नेते यांच्याशी नव्याने थेट संवाद साधायला सुरुवात केली. नेपाळमध्ये तिथल्या नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने कारभार करावा पण भारताशी असलेली परंपरागत मैत्री कायम राखावी अशा स्वरुपाचे धोरण भारताने स्वीकारले. करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आधी वैद्यकीय मदत आणि अलिकडेच नेपाळला लसीचे डोस पुरवण्यात आले.

भारत आणि नेपाळ यांचे संबंध सुधारत असतानाच ओली यांची कम्युनिस्ट पार्टीतून हकालपट्टी झाल्याचे जाहीर झाले. आता ओली आणि प्रचंड पुन्हा स्वतंत्रपणे स्वतःच्या गटाचे राजकीय सामर्थ्य वाढवण्यासाठी काम करण्याची शक्‍यता आहे.

ओलींनी अध्यक्षपद गमावले
पत्नीवर उपचार करुन घेण्यासाठी काही काळ मुंबईत राहिलेले नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी मायदेशी परतल्यानंतर तातडीने पार्टीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून ओली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसला ओली यांनी उत्तर दिले नाही. अखेर कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदावरुन ओली यांची हकालपट्टी केल्याचे प्रचंड यांच्या गटाने जाहीर केले. नंतर प्रचंड यांच्या गटाने ओली यांचे पक्षाचे सदस्यत्वही रद्द केल्याचे जाहीर केले.

ओलींचे हंगामी पंतप्रधानपद सुरक्षित
पार्टीतून हकालपट्टी झाली तरी हंगामी पंतप्रधान म्हणून नेपाळचा कारभार ओली बघत आहेत. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. याच कारणामुळे प्रचंड यांच्या गटाने पक्षातून दूर केले तरी ओली यांचे हंगामी पंतप्रधानपद सुरक्षित आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात संसद विसर्जित करण्यावरुन सुनावणी सुरू आहे. या सुनावणीअंती येणाऱ्या निकालावर ओली यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.