मनमाड – विरोधक केंद्रावर संविधान बदलण्याचा आरोप करत आहेत. पण त्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. उलट त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला एकही निवडणूक जिंकू दिली नाही, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधताना केली.
पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी प्रचार घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांचा विशेषतः काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. सद्यस्थितीत कांदा व शेतपिकांचे मोठे प्रश्न आहेत.
पण सरकार शेतकऱ्यांवर कुणाच्याही समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना योग्य दर दिला तर शेतकरी कायम आपल्या पाठिशी उभे राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंचितांची बाजू मांडत आहेत. यामुळे प्रभू श्रीराम व शिवरायांच्या कामांची आठवण होत आहे, असे पंकजा म्हणाल्या.
विरोधक मुस्लिमांना मोदींपासून धोका असल्याचा अपप्रचार करत असल्याचा दावाही पंकजा यांनी यावेळी केला. विरोधक मुस्लिमांना मोदींची भीती बाळगण्याच्या भूलथापा देत आहेत. कशामुळे डरो? गत 10 वर्षांत एकाही मुसलमानाच्या केसाला धक्का लागला नाही.
उलट त्यांचे बळकटीकरण करण्यात आले. विरोधक केवळ मतांच्या राजकारणासाठी मुस्लिमांना भाजपची भीती घालत आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी मुस्लिम समुदायाला सुरक्षेची ग्वाहीही दिली.
सरकार संविधानाची काळजी घेण्यास सक्षम
विरोधक सरकारवर संविधान बदलण्याचा आरोप करत आहेत. ते कोणत्याही वाक्याचा अनर्थ करत आहेत. मोदींची संविधानातील एक शब्दही बदलण्याची मानसिकता नाही. उलट त्यांचा प्रयत्न संविधान अधिक सुरक्षित करण्याचा आहे.
ज्या लोकांनी महामानवाला एक निवडणूक जिंकू दिली नाही, त्यांनी त्यांच्या राज्यघटनेची काळजी करण्याची गरज नाही. त्या राज्यघटनेची काळजी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी यावेळी काँग्रेसवर निशाणा साधताना केली.