मोरोगोरो (टांझानिया) – टांझानियातील पश्चिमेकडील दर एस सालेम या आर्थिक राजधानीमध्ये तेलाचा टॅंकर उलटून झालेल्या भीषण स्फोटामध्ये तब्बल 57 जण मरण पावले आहेत. मोरोगोरो शहराजवळ ही दुर्घटना घडली. टॅंकर उलटल्यानंतर सांडायला लागलेले तेल गोळा करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती.
त्या गर्दीतूनच सिगारेटच्या थोटकामुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 57 जण मरण पावल्याचे निष्पन्न झाले आहे, असे स्थानिक पोलिस प्रमुख विलब्रोड मताफुंग्वा यांनी पत्रकारांना सांगितले.
हा स्फोट इतका भीषण होता की रस्त्यावरून जाणाऱ्या टॅक्सी आणि मोटरसायकलीही जळून खाक झाल्या. आजूबाजूच्या झाडांनीही पेट घेतला आणि मोठी आग पसरली होती. मरण पावलेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने “बोडा-बोडा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या टॅक्सी चालकांची संख्या जास्त आहे. याशिवाय स्थानिक गावकऱ्यांनीही सांडणारे इंधन गोळा करण्यासाठी टॅंकरभोवती गर्दी केली होती.
मोरोगोरो शहराच्या आजूबाजूला अद्याप अशाप्रकारची दुर्घटना कधी घडलेली नव्हती, असे मोरोगोरोचे गव्हर्नर स्टीफन केब्वी यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या महिन्यात पेट्रोलचा टॅंकर उलटून अशाच प्रकारे झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 45 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. मे महिन्यात निगेर शहराजवळही अशाच अपघातामध्ये किमान 80 जण मरण पावले होते.
यासारखेच अपघात यापूर्वी 2010 साली कॉंगो अणि 2015 च्या सप्टेंबरमध्ये दक्षिण सुदानमधील मंडीमध्ये घडले होते. कॉंगोतील दुर्घटनेत 292 तर दक्षिण सुदानमधील दुर्घटनेत 203 जण मरण पावले होते.