मुंबई – टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने अल्पवयीन मुलीचा गळा घोटून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालिकांमध्ये काम न मिळाल्याने नैराश्येतून तिने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही हृदय पिळटून टाकणारी घटना ठाण्याच्या कळवा येथील गौरी सुमन सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी घडली. प्रज्ञा पारकर असे या अभिनेत्रीचे, तर श्रुती पारकर असे तिच्या मुलीचे नाव आहे.
प्रज्ञा पारकर यांचे पती प्रशांत पारकर हे सकाळी जिमला गेले होते. ते घरी परत आल्यावर घरात प्रवेश करताच मुलगी श्रुती बेडवर पडलेली, तर गळफास लावलेल्या अवस्थेत पत्नी प्रज्ञा दिसली. घरातील भयावह चित्र पाहून प्रशांत यांना धक्का बसला. त्यांनी या सर्व प्रकाराची माहिती तातडीने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांना घरातून सुसाइड नोट सापडली आहे. यात मालिकांमध्ये काम मिळत नसल्याने प्रचंड डिप्रेशन आले आहे. त्यामुळे मुलगी श्रुतीची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करत असल्याचे प्रज्ञा पारकर यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.