नाशिक : नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शहरातील गंजमाळ झोपडपट्टीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा घुशीने हात कुरतडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक शहरातील गंजमाळ झोपडपट्टी दाट लोकवस्तीचा परिसर आहे. याच ठिकाणी 90 वर्षीय बबाबाई गायखे या अनेक वर्षापासून त्याठिकाणच्या झोपडपट्टीत राहत होत्या. मोठा मुलगा अशोक हा देखील पंचशीलनगरमध्ये राहतो. तर दुसरा लहान मुलगा मनोज हा कामानिमित्त पुण्याला असतो. शुक्रवारी रात्री उशिरा झोपेत असताना आजीबाईच्या हातासह पंजाला घुशीने कुरतडून काढले. यात त्यांचा हात रक्तबंबाळ झाला.
रात्री कुठं जायचं म्ह्णून सकाळपर्यत तशाच अवस्थेत झोपून राहिल्या. त्यानंतर सकाळी सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आजीबाईचा जिल्हा रुग्णालय दाखल केले. नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर दिवसभर उपचार करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झालेल्या बबाबाई गायखे यांचा रात्री उशिरा मध्यरात्री मृत्यू झाला.
बबाबाई यांच्या मृत्यूने नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिकमध्ये महापालिकेच्या ठेकेदाराच्या दिरंगाईनेच हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर दुसरीकडे महापालिकेने देखील या प्रकरणात आपले हात झटकले आहेत.