रोम : माणसाला पाळीव प्राण्यांचे आकर्षण असणे एक नैसर्गिक गोष्ट जरी मानली जात असली तरी या आकर्षणाने जर अतिरिकी टोक गाठले तर काय होऊ शकते याचे उदाहरण इटलीमध्ये समोर आले आहे. इटलीमध्ये एका महिलेला मांजरांविषयी प्रचंड आकर्षण असल्याने तिला आपणही मांजर व्हावे असे वाटत होते. याच आकर्षणातून तिने गेल्या काही वर्षांमध्ये शरीरावर तब्बल 20 शस्त्रक्रिया केल्या असून आपण मांजरासारखे दिसतोय की नाही हे जगाला दाखवण्यासाठी तिने अनेक व्हिडिओही गेल्या काही कालावधीमध्ये शेअर केले आहेत.
न्यूयॉर्क पोस्टमध्ये या महिलेची माहिती प्रसिद्ध झाली असून या माहितीप्रमाणे या महिलेचे नाव चीयारा डेलअबेट असे असून ती 22 वर्षाची आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून ती आपल्या शरीरावर प्रयोग आणि शस्त्रक्रिया करून मांजरासारखा दिसण्याचा प्रयत्न करत आहे. वयाच्या अकराव्या वर्षी सर्वात प्रथम शस्त्रक्रिया करताना तिने आपले कान टोचून घेतले आणि कानाची लांबीही वाढवली तिचे कान सध्या एखाद्या मांजरासारखे दिसत आहेत.
काही दिवसापूर्वी तिने आपली जीभही कापून घेतली असून तिच्या जिभेचे दोन भाग केलेले दिसत आहेत. शरीरावरील चरबी हटवण्यासाठी सुद्धा तिने काही शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच डोळे नाक आणि हातांची रचना बदलण्यासाठी सुद्धा तिने शरीरात काही सुधारणा करून घेतल्या आहेत. चियाराचे हे वेड पराकोटीला गेले असल्यामुळे अनेक लोकांच्या मते ती मनोरुग्ण आहे किंवा तिला वेड लागले आहे. तिच्या मते मात्र तिची ही पॅशन असून येत्या काही वर्षांमध्ये ती संपूर्णपणे एका कॅट लेडीमध्ये रूपांतरित होणार आहे.