वडगाव मावळ – लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र या कामकाजातील क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विविध पथकाचे प्रमुख व कर्मचाऱ्यांचे भत्ते सहा महिने होऊनही मिळालेले नाहीत. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कार्यरत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही अद्यापपर्यंत भत्ते न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मावळ लोकसभेसाठी एप्रिल महिन्यात मतदान झाले होते तर मे महिन्यात मतमोजणी पार पडली होती. तर विधानसभा निवडणूक आक्टोंबर महिनण्यात पार पडली. या दोन्ही निवडणुकांसाठी 200 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, विविध पथकात काम केले. मात्र त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला अद्याप त्यांना मिळाला नाही. त्यासाठी हे अधिकारी व कर्मचारी वारंवार मावळ तहसीलदार कार्यालयाच्या निवडणूक विभागात भत्ता मिळण्याबाबत चौकशी करीत आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भत्ता बिले जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहेत. बिलाचा निधी उपलब्ध झाल्यावर त्वरित वाटप करण्यात येईल.
– आर. एल. कांबळे, नायब तहसीलदार, मावळ