पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत (पीएमपीएमएल) रेल्वे स्थानकाच्या आवारातून प्रवाशांच्या सोईसाठी रात्रीची बससेवा सुरू केली आहे. या रातराणी बसचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. तसेच, या बसच्या तिकिट दरात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने थेट रेल्वे स्थानकाच्या आवारातून लेन क्रं 4 मधून बससेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आर्थिक उत्पन्नही वाढत आहे. मात्र, या बस केवळ दिवसा चालू असल्याने रेल्वेने ये-जा करणाऱ्या रात्रीच्या प्रवाशांची गैरसोय होत होती. यामुळे रात्रीची बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
रातराणी बसचे वेळापत्रक
पुणे रेल्वे स्थानक ते रामोशी गेट स्वारगेटमार्गे (दर 30 मिनिटांनी), रेल्वे स्थानक ते हडपसर पुलगेट वेस्टएन्ड मार्गे (25 मिनिटांनी), रेल्वे स्थानक ते एनडीए गेट शिवाजीनगर-डेक्कन-वारजेमार्गे (45 मिनिटांनी), रेल्वे स्थानक ते वाघोली येरवडा-चंदनगरमार्गे (1 तास 30 मिनिटांनी, रेल्वे स्थानक ते भोसरी शिवाजीनगर-बोपोडी-कासारवाडीमार्गे (1 तासाने), रेल्वे स्थानक ते निगडी शिवाजीनगर-बोपोडी-पिंपरीमार्गे (45 मिनिटांनी) या बस धावणार आहेत. यावेळी, रात्रीच्या बससेवेच्या संचलनासाठी 15 बस उपलब्ध राहणार असल्याचे, पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.