दक्षिणेकडील राज्यात पाठविला कांदा : यापूर्वीही खरेदीस नागरिकांनी दर्शवली होती नापसंती
पुणे – तुर्कीचा कांदा खरेदीकडे पुणेकरांनी पाठ फिरविली आहे. अवघे 500 किलो कांदाच नागरिकांकडून खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित कांदा मार्केटयार्डातून दक्षिणेकडील राज्यात गेला. यापूर्वी इजिप्तचा कांदा येथील मार्केटयार्डात दाखल झाला होता. तो खरेदी करण्यास पुणेकरांनी नापसंती दर्शविली होती.
तुर्कीच्या कांद्याला दर्जानुसार घाऊक बाजारात एका किलोसाठी 60 ते 80 रुपये भाव मिळाल्याची माहिती कांद्याचे व्यापारी गणेश शेडगे यांनी दिली. तुर्कीतून मुंबईत कांदा दाखल झाला. तेथून तो रविवारी पुण्याच्या मार्केटयार्डात दाखल झाला. पुण्यात गणेश शेडगे यांच्या गाळ्यावर दोन कंटेनर, आणखी एका व्यापाऱ्याच्या गाळावर दोन कंटेनर असे एकूण 4 कंटेनर म्हणजे सुमारे 120 टन आवक झाली होती. त्यामुळे भाव खाली येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पुणेकरांनी तो खरेदी न केल्यावर कांद्याच्या भावावर फारसा परिणाम झाला नाही.
याविषयी गणेश शेडगे म्हणाले, तुर्कीचा कांदा रंगाने पिवळसर होता. तसेच, 15 दिवस कंटेनरमध्ये असल्याने तो ओला झाला होता. या कांद्याची चव आपल्यासारखी असली तरी टिकण्याची क्षमता कमी आहे. देशातील कांद्याची ग्रेव्ही केल्यानंतर ती जास्त दिवस टिकते. त्या तुलनेत तुर्कीच्या कांद्याची ग्रेव्ही टिकत नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, खानावळ वाल्यांनी हा कांदा खरेदी केला नाही. मात्र, या कांद्याला दक्षिणेकडील राज्यांनी मागणी केली होती. त्यामुळे हा येथून दक्षिणेत पाठविला. दक्षिणेत विशेषत: कर्नाटक, आंध्र प्रदेशातील राज्यांनी तो खरेदी केला. बाजारात पुन्हा तुर्कीच्या कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे.