पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाने संबंधित वक्तव्याबाबत पाटील यांच्याकडून खुलासा मागविला आहे.
ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत.