मुंबई – कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने आज (शुक्रवार,27 मे) क्लीनचीट दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी जो एनसीबीचा फर्जीवाडा उघड केला होता त्यावर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
जे आरोप नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर केले ते आज खरे ठरले आहेत. एनसीबीने टाकलेली धाड हीच फर्जीवाडा आहे हे ते पहिल्या दिवसापासून सांगत होते, असेही महेश तपासे म्हणाले.
ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये पंच निवडण्यात आले होते त्याच्यावर अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. त्यानंतर स्वतः पंचांनी सुद्धा कोऱ्या कागदावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असल्याचे सांगितले होते. या दरम्यान एका पंचाचा अनैसर्गिक मृत्यूदेखील झाला, दुसऱ्या पंचाने पैशांच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा होत असल्याचेही सांगितले होते. या सर्व गोष्टी लक्षात घेता नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेले आरोप आता खरे असल्याचे दिसून येते, असेही महेश तपासे म्हणाले.