पिंपरी – सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये केलेली रक्कम परत न करता दुकान बंद करून पळून गेल्या प्रकरणी गुडविन ज्वेलर्सच्या पाचजणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी योहन्नान थॉमस (वय 64, रा. अजमेरा, मोरवाडी) यांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. थॉमस यांच्या तक्रारीवरून गुडविन ज्वेलर्सचे अध्यक्ष सुनीलकुमार, संचालक सुधीरकुमार, व्यवस्थापक रितेश, रवि के नायर, सेतू पनीकर व इतर संचालक व सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीमधील आरोपींनी गुडविन ज्वेलर्सची साखळी पद्धतीने विविध ठिकाणी दुकाने असून सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास तसेच फिक्स डिपॉझिटमध्ये रक्कम गुंतविल्यास अधिकचा फायदा मिळेल असे सांगून सन 2012 पासून आतापर्यंत वेळोवेळी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या पत्नीने वेळोवेळी 29 लाख रुपये गुंतविले. मात्र सोन्यावरील परतावा न देता तसेच फिक्स डिपॉझिटची मुदत संपल्यानंतरही रक्कम परत न देता फसवणूक केली. तसेच दुकान बंद करून संबंधित आरोपींनी पळ काढला आहे.
आपल्यासह इतर अनेकांनी गुडविन ज्वेलर्समध्ये लाखो रुपये गुंतविले असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत.