China-Russia Relations : पुतिन आणि जिनपिंग यांच्या भेटीने अमेरिका अस्वस्थ, बीजिंगला दिली धमकी…

वॉशिंग्टन :- रशियाच्या राष्ट्रपती पदावर फेरनिवड झाल्यानंतर ब्लादिमिर पुतीन आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यात चीनच्या भेटीवर गेले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी त्यांची ( Xi Jinping and Vladimir Putin )बैठकही झाली असून पुतीन यांच्या भेटीबद्दल अमेरिकेने नापसंती व्यक्त केली आहे. त्याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनचे युध्द सुरू असून त्यात पश्चिमेकडील देश युक्रेनचे समर्थन करत आहेत. त्यांनी रशियावर निर्बंधही लादले आहेत. तसे असूनही रशिया आता सक्रियपणे चीनचा पाठिंबा मागत असल्यामुळे अमेरिका नाराज आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार चीन रणनीतीक आणि राजनैतिक दृष्ट्या रशियाचे समर्थन करतो. संयुक्त राष्ट्रांतही रशियावरील निर्बंधांच्या विरोधात चीनने रशियाची बाजू घेतली आहे. त्याचवेळी युध्दावर तोडगा काढण्याबाबत तो देश रशियाशी चर्चाही करतो आहे. मात्र त्याचवेळी पाश्चिमात्य देशांसोबतचा आपला व्यापार सुरू राहावा असे संतुलन साधण्याचाही चीनचा प्रयत्न असतो. तथापि, तुम्ही एकाच वेळी दोन्ही प्रकार अवलंबू शकत नाही अशी टिप्पणी आता अमेरिकेने केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, येणाऱ्या दिवसांत युरोपीय देशांशी चांगले आणि दृढ संबंध ठेवण्याची चीनची इच्छा नाही. त्यामुळे पुढील काळात युरोपीय देशांचा धोका वाढवण्याचे काम त्यांच्याकडून केले जाईल. जी-७ देश, नाटोमधील सहकारी आणि युरोपीय संघातील आमचे सहकारी देशांना अमेरिकेची ही भूमिका कळवण्यात आली आहे.
पटेल पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की, चीन रशियाला शस्त्रांचा पुरवठा करतो आहे. त्यांची ही कृती केवळ युक्रेनलाच नाही तर युरोपातील सगळ्याच देशांना धोक्याची सूचना आहे. रशियासोबत अशा प्रकारचे संबंध ठेवून चीन कोणत्याही परिस्थितीत युरोपीय देशांशी संबंध सुधारू शकत नाही.





