Odisha Accident : ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर या भीषण अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेल्या व्हॅनने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे आज सकाळी हा अपघात झाला. सर्व मृत गंजम येथील दिगापहांडी येथील रहिवासी होते.
पोदामारी गावातील 20 जण व्हॅनमधून जिल्ह्यातील माँ तारिणी मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला. यातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा घाटगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला जखमींना घाटगाव रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर त्यांना कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचे चक्काचूर झाले.
माहिती मिळताच बळीजोडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रात नेले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी केओंजरचे एसपी कुसाळकर नितीन दगुडू म्हणाले, “२० जणांनी भरलेली व्हॅन भरधाव वेगात जात होती आणि त्याचवेळी ट्रकला धडकली. धुके असल्याने व्हॅन चालकाने अपघात केल्याची शक्यता आहे. ट्रक बघू शकलो नाही.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हॅनमधील दोन कुटुंबे आणि त्यांच्या शेजारी राहणारे लोक काल गुरुवारी (३० नोव्हेंबर) रात्री माँ तारिणीच्या दर्शनासाठी घरातून निघाले होते. हा भीषण अपघात शुक्रवारी (01 डिसेंबर) पहाटे पाचच्या सुमारास घडला.