नवी दिल्ली ( OBC caste census ) – ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसह आज बिहार येथील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-जेडीयू आघाडीविरोधात एकाकी लढा दिल्याचं पाहायला मिळालं होत.
तेजस्वी यादव यांनी आज पंतप्रधानांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना, आमहाला आता निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं म्हंटलं. “आमच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट केवळ राज्यातील ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी नसून संपूर्ण देशातील जातनिहाय जनगणनेसाठी आहे. जर देशातील प्राणी आणि झाडांची गणना होत असेल तर लोकांची देखील व्हायला हवी. जनगणना झाल्यास ते गरिबांच्या कल्याणासाठी उचललेलं महत्वाचं पाऊल ठरेल.” असं तेजस्वी यादव म्हणाले.
“जर केंद्र सरकारला जातनिहाय जनगणना केल्याने समाजात तेढ निर्माण होण्याची भीती वाटत असेल तर त्यांनी धर्म आधारित जनगणना देखील करू नये.” असं शिष्टमंडळाने पंतप्रधानांना सांगितल्याचं यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ( OBC caste census )
दरम्यान, ओबीसी जनगणनेवरील यादव यांच्या राजद व कुमार यांच्या जेडीयूचे एकमत राज्यात पुन्हा एकदा कुमार-यादव आघाडी होऊ शकते असा भाजपला दिलेला इशारा आहे काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जेडीयूच्या नेत्यांनी, ‘जेडीयू एनडीएचा घटक पक्ष असल्याचं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. अशा चर्चाना काहीही अर्थ नाही.’ असं सांगितलं आहे. ( OBC caste census )
Delhi | Our delegation met the PM today not only for caste census in the state (Bihar) but in the entire country. We are awaiting a decision on this now: Tejashwi Yadav, RJD after meeting with PM Modi over caste census pic.twitter.com/HRyg77P3D5
— ANI (@ANI) August 23, 2021