पुणे – राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या पुणे आरटीओमध्ये एका वर्षापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. तसेच, प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे चार महिन्यांपासून आहे. एकाच अधिकाऱ्यावर पुणे आरटीओच्या सर्व कामांचा भार आहे. तसेच, इतर काही पदे रिक्त असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन-मालक- चालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरटीओमध्ये वाहन मालक आणि चालकांच्या कामांना विलंब होत आहे. गर्दी अधिक आणि मनुष्यबळ अपुरे अशी स्थिती सध्या परिवहन विभागात आहे. त्यामुळे राज्यातील परिवहन विभागातील रिक्त पदे तत्काळ भरावीत. रखडलेल्या पदोन्नती आणि बदल्या तत्काळ कराव्यात, अशीही मागणी बाबा शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, परिवहन विभागात सध्या अप्पर व सहआयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. तर, २३ प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांचा तात्पुरता पदभार सध्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. पदोन्नती रखडल्यामुळे आरटीओचा कारभार अतिरिक्त कारभार उप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आहे.
तसेच, परिवहन विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची १०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वाहन चालक व मालकांची कामे होण्यास विलंब लागत आहे. त्यात आरटीओतील यंत्रणाही अधी-मध्ये बंद पडत आहे. त्यामुळे परिवहन विभागाने तात्काळ पदोन्नती करावी आणि रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी बाबा शिंदे यांनी केली आहे.