हडपसर (प्रतिनिधी) – हडपसर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे जाळे येथे आहे, त्यामुळे आजही या मतदारसंघात काँग्रेसला पोषक वातावरण आहे. महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा फायदा होणार असून निष्ठावंत, प्रामाणिक व निवडून येण्याची क्षमता आलेल्या कार्यकर्त्यांना त्यामध्ये प्राधान्य दिले जाईल, असे मत माजी गृहराज्यमंत्री व शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष रमेश बागवे बोलत होते.
माजी राज्यमंत्री शिवरकर म्हणाले की, काँग्रेसला गौरवशाली परंपरा असून पक्षाने निष्ठावंतांना कायम न्याय दिला आहे. पुढील काळातही पक्षाची हीच भूमिका राहील.
माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, हडपसर ब्लॉक अध्यक्ष प्रशांत तुपे, महिला अध्यक्षा माया ढुरे, अल्पसंख्याक विभागाचे सुलतान खान, बाळासाहेब गोंधळे, यशवंत साळुखे, शहर सरचिटणीस दिलीप शंकर तुपे, चंद्रकांत ससाणे, विजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते. उर्मिला आरु, नितीन आरू, गणेश फुलारे, वैभव डांगमाळी, स्वप्नील डांगमाळी, बाळासाहेब हिंगणे यांनी मेळाव्याचे संयोजन केले.