खासगी वाहनांची संख्या घटली!

… तरीही 38 लाख 88 हजार 690 वाहने

पुणे – वाढती वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव तसेच वाहनांच्या वाढत्या किमती यामुळे शहरातील वाढत्या खासगी वाहनांच्या संख्येला ब्रेक लागत आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 अखेर शहरात 2 लाख 61 हजार 410 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. तर याच कालावधीत 2017-18 मध्ये सुमारे 2 लाख 99 हजार 10 वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामुळे नवीन वाहन खरेदी कमी झाली असून सुमारे 28 हजार 500 नी हा खरेदीचा आकडा घटल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल बुधवारी मुख्य सभेत सादर करण्यात आला.

आयुक्‍त सौरभ राव यांनी हा अहवाल महापौर मुक्‍ता टिळक यांना सादर केला. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, विरोधीपक्ष नेते दिलीप बराटे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. विपीन शर्मा, शान्तनू गोयल, रूबल अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

दुचाकी-चारचाकी होत आहेत कमी
पर्यावरण अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यात प्रामुख्याने दुचाकी वाहनांच्या बेसुमार खरेदी कमी झाली असल्याचे चित्र आहे. शहरात 2016-17 मध्ये 1 लाख 79 हजार नवीन दुचाकींची खरेदी झाली होती. तर हा आकडा 2017-18 मध्ये तब्बल 2 लाख 5 हजार 4 वर गेला होता. मात्र, 2018-19 मध्ये यात घट आली असून 2018-19 मध्ये 1 लाख 76 हजार 314 दुचाकींची खरेदी झाली आहे. त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांच्या खरेदीलाही पुणेकरांनी मागील वर्षात ब्रेक दिला आहे. 2016-17 मध्ये शहरात 49 हजार 745 चारचाकी वाहनांची नोंद झाली होती. हा आकडा 2017-18 या वर्षात 56 हजार 401 वर गेला होता. तर 2018-19 मध्ये आकडा पुन्हा खाली येत 47 हजार 617 वर आला आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांची खरेदीही घटली आहे.

शेअर मोबिलिटीला पुणेकरांची पसंती
एका बाजूला खासगी वाहनांची संख्या कमी होत असली तरी, प्रवासी वाहनांची नोंदणी मात्र, गेल्या वर्षभरात वाढली आहे. त्यात प्रामुख्याने नवीन रिक्षा आणि खासगी प्रवासी कंपन्यांच्या चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांमध्ये रिक्षा, टॅक्‍सी, कॅब्स, प्रवासी बसेस, स्कूल बसेसचा समावेश आहे. 2017-18 मध्ये सुमारे 99 हजार 19 नवीन प्रवासी वाहनांची नोंद झाली होती. हा आकडा 2018-19 मध्ये 1 लाख 23 हजार 46 वर पोहोचला आहे. त्यात सर्वाधिक रिक्षा आणि प्रवासी कॅबची नोंदणी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांचा या शेअर मोबिलिटीला प्रतिसाद मिळत असल्याने खासगी वाहने घेण्याचा कल कमी झाला असल्याचे चित्र आहे.

शहरात दरडोई एक वाहन
तरल लोकसंख्या गृहीत धरता शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगननेनुसार सुमारे 39 लाख आहे, तर एकूण वाहनांची संख्या 38 लाख 88 हजार 690 आहे. त्यामुळे ही वाहनांची संख्या पाहता दरडोई एक वाहन असल्याचे चित्र आहे. गेल्या दहा वर्षांत ही वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2009 मध्ये शहरात 17 लाख 60 हजार 402 वाहने होती. या वाहनांमध्येही सर्वाधिक वाहने दुचाकी असून या वाहनांची संख्या सुमारे 28 लाखांच्यावर आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.