मुसळधार पावसामुळे सज्जनगड घाटात झाड उन्मळून रस्त्यावर

सज्जनगड घाटातील वाहतूक काही काळ ठप्प

ठोसेघर  – सातारा तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील परळी खोऱ्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळित झाले आहे. बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान सज्जनगड घाटातील रस्त्याच्या कडेला असलेले झाड मुसळधार पावसामुळे उन्मळून रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

परळी खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा थेट परिणाम स्थानिक रहिवाशांच्या जनजीवनावर होऊ लागला आहे. ठोसेघर, चाळकेवाडी या परिसरातील गावांना शहराशी जोडणाऱ्या सज्जनगड, बोरणे घाटातील रस्ता काही दिवसांपूर्वी खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील घाटात एकेरी पध्दतीने धोकादायक रित्या सुरू आहे. तर काही दिवसांपूर्वी सज्जनगड घाटात झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्याच ठिकाणी पुन्हा एकदा बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास झाड उन्मळून रस्त्यावर पडले होते. त्यामुळे वाहतूकीसाठी अडसर निर्माण झाला होता.

दरम्यान, रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडलेल्या झाडांमुळे या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घाटात अडकुन पडलेला वाहनधारक आणि प्रवाशांनी स्वतः पुढाकार घेऊन रस्त्यातील झाडाचे अवशेष बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला केला. सज्जनगड बोरणे घाटात वारंवार दरडी कोसळणे रस्ता खचणे, झाडे उन्मळून रस्त्यावर पडणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.