महेश जाधव
मायणी पक्षी आश्रयस्थानात विविध प्रजातींचे पक्षी दाखल
मायणी – यावर्षी खटाव तालुक्यात चांगलाच पाऊस झाल्यामुळे पाच वर्षानंतर मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात नावलौकिक असणाऱ्या येथील दुर्मिळ पक्षांच्या आश्रयस्थानात विविध प्रजातींच्या पक्षांनी हजेरी लावली असून पर्यावरण-प्रेमी, निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पक्षी निरीक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फ्लेमिंगो या परदेशी पाहुण्यांच्या आगमनाची प्रतीक्षा मायणी पक्षी आश्रयस्थान करत आहे.
1890 मध्ये सुमारे 35 फूट खोल व 500 एकर क्षेत्रात पसरलेला हा ऐतिहासिक तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरला आहे. चांद नदीवर या ऐतिहासिक तलावाची बांधणी करण्यात आली आहे.वातावरणात बदल होऊन थंडीत वाढ होत आहे. त्यामुळे थंडीत स्थलांतर करणाऱ्या विविध पक्ष्यांची हजेरी या तलावावर लावली आहे.
मायणी, म्हसवड, राजेवाडी, येरळवाडी येथे दरवर्षी थंडीच्या काळात फ्लेंमिंगोचे मुख्य अन्न असलेली ओटोलिया ही वनस्पती या तलावामध्ये उपलब्ध आहे. साधारणत: डिसेंबर ते जानेवारीत जास्त थंडी पडू लागली की फ्लेमिंगोसह डॅबचिक, किंगफिशर, चक्रवाक, शेकाट्या, कॉमन टी बदक आदी पक्षी या काळात हजेरी लावतात. सध्या थंडीचे वातावरण असून मायणी पक्षी आश्रयस्थानात विविध प्रजातीच्या पक्षांनी हजेरी लावली आहे तर रोहित पक्ष्यांच्या आगमनाची आश्रयस्थान वाट पहात आहे.
यंदा खटाव, माण तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे चांगल्या प्रमाणात पाणीसाठा झाला असल्याने अनेक लहान मोठ्या तलावात पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी व कानकात्रे तर माण तालुक्यातील राजेवाडी तलावात पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पक्षी आश्रयस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मायणी येथे स्थलांतरित होणाऱ्या फ्लेंमिंगो पक्ष्यांना राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळाने इयत्ता नववीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये सचित्र स्थान दिले होते.