सेमी इंग्रजीच्या शिक्षकांचा तुटवडा

नवीन भरतीऐवजी आहे त्याच शिक्षकांना प्रशिक्षण

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये नवीन शिक्षकांची भरती करण्याऐवजी शाळेतील शिक्षकांनाच प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिक्षण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या शिक्षकांना सेमी इंग्रजीचे प्रशिक्षण दिले जात आहे. महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 102 आणि बालवाडीच्या 78 अशा एकूण 180 शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. उल्लेखनीय बाब अशी की, “दोन हजार विद्यार्थ्यांसाठी केवळ 34 शिक्षक’ हे वृत्त दैनिक “प्रभात’ने 24 नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. त्यानंतर हालचालींना जास्त वेग आला.

जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेच्या अंतर्गत बजाज एज्युकेशन इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत महापालिकेच्या शिक्षकांना सेमी इंग्रजीचे धडे दिले जात आहे. सेमी इंग्रजीसाठी जाहिरात देऊनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यामांसारखे शिक्षण मिळावे असा आग्रह पालक करीत होते. त्यासाठी ऑगस्ट 2018 च्या शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी इंग्रजी शिकविण्यासाठी शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर निवडीसाठी शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये अपेक्षित असणारे शिक्षक मिळाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

साधारण शिक्षकांसाठी नऊ प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणात मुलांना इंग्रजी कसे शिकवावे, विद्यार्थ्यांना शिकविताना कोणता विषय कसा हातळावा, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी लागणारे साहित्य व पुस्तके शिक्षकांना पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

शिक्षकांची तब्बल 100 पदे रिक्‍त
सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या सर्व शाळेमध्ये सेमीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे हळूहळू अनेक शाळेतील वर्ग बंद करण्यात आले. सद्यस्थितीला महापालिकेच्या 34 शाळांमध्ये सेमीचे वर्ग सुरु आहेत. या शाळेमध्ये दोन हजार विद्यार्थी सेमी इंग्रजीचे धडे गिरवत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ 34 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेमी इंग्रजी शिकवण्यासाठी पदवीधर डीएड शिक्षकांची आवश्‍यक्ता असते. अशी तब्बल 100 पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे आता इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

सेमी इंग्रजीसाठी मुलाखतीमध्ये हवे तसे शिक्षक मिळाले नाही. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षकांनाच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे, तसेच शिक्षकांनाही या प्रशिक्षणाचा भविष्यामध्ये फायदा होईल.
– ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, पिं.चिं. महापालिका.

Leave A Reply

Your email address will not be published.