काशी विश्वेश्वराला अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिली भेट
पंढरपुर – सदैव भक्तांची गर्दी असणारं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध देवस्थान म्हणजे पंढरपूर. आता पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेशातल्या काशी विश्वेश्वर देवस्थानाकडून प्रेरणा घेतली जात आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काशी विश्वेश्वर देवस्थानाला भेट दिली. तसेच तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गर्दी व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा केली. लवकरच काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपुरात देखील गर्दी व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यान्वीत होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वाराणसीमध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काशीमधील भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाचे मॉडेल समजून घेतले. पंढरपूरचा विकास काशी मॉडेलनुसार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच एक बैठक घेणार आहे. हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना या दौऱ्याबाबत आणि मॉडेलसंदर्भात माहिती देणार आहे.
पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दररोजच्या भाविकांची संख्या मर्यादित असली तरी एकादशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात आषाढी, कार्तिकीसारख्या मोठ्या एकादशीला तर पंढरीत भाविकांचा जनसागरच लोटतो. अशा वेळी गर्दीचे नियोजन करताना प्रशासनाची देखील तारांबळ उडते. यात्राकाळात पंढरपूरमध्ये वाहतुकीचा देखील खोळंबा होतो. तसे पार्किंगची देखील व्यवस्था होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो.
या दौऱ्यात वाराणसीच्या पोलीस आयुक्तांनी काशी मॉडेलची माहिती महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना दिली. सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कशा प्रकारे वाहतुकीचे नियोजन वाराणसीत केले जाते. याबाबत गर्दीचे नियोजन कसे केले जाते याची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली.